Thursday, 28 May 2015

योग - भाग ३

योग - भाग १

योग - भाग २

अखेर ऑगस्ट महिना संपत आल्यानंतर गोखले महाविद्यालयात प्रवेश मिळाला. विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुढे Engineering करणार हे तर ठरलं होतं, पण बारावीला कमी गुण मिळाले आणि Engineering ला प्रवेश नाही मिळाला तर Backup Plan म्हणून Microbiology ला प्रवेश घेऊ अशा विचाराने PCMB ग्रुप घेतला. फी फक्त दोन हजार रुपये! यादीत नाव न दिल्याने आणि ओळखीने प्रवेश घेतल्याने "इ" तुकडी मिळाली. शेवटून दुसरी. या कॉलेजचं वैशिष्ठ्य म्हणजे इथे फक्त अ आणि ब या दोनच तुकड्यांच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरवले जाई. प्रवेश घेऊन कॉलेजला जाऊन दोनच दिवस होत नाहीत तर महाविद्यालयीन शिक्षकांचा संप सुरु झाला. अकरावी बारावी विज्ञान private tutions ची फी तर मुळीच परवडणारी नव्हती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संप मागे घेतला गेला. पण आधीच दीडेक महिन्याचा अभ्यास बुडलेला, नंतर संपाचा दीड महिना, असं करून शिक्षकांनी थेट चार-पाच महिने पुढचं शिकवायला सुरुवात केली.
 
पंधरा दिवस होत नाहीत तर पहिली semester आली त्यामध्ये दोन विषय गेले. गणितात Derivation आणि Integration या नवीन गोष्टी आणि सगळा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्याने अवघड गेलं सगळं. घरी निकाल समजल्यावर आईची बडबड सुरु झाली ते ही ऐकून घ्यावं लागलं. अकरावीला ३७% गुण मिळवून कसंबसं पास होता आलं तेच महत्त्वाचं वाटलं तिला. PPS शिक्षकांनी कितीही speed मध्ये शिकवलं असतं तरी इतकं नुकसान तर नक्कीच झालं नसतं असा विचार सारखा मनात येई. संपदेखील फक्त महाविद्यालयीन शिक्षकांचा झाला होता. आणि संप नसतानादेखील इ तुकडीकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला होता. 
 
बारावी सुरु झाली. अकरावीच्या टक्केवारीमुळे आता थेट शेवटच्या तुकडीत रवानगी झाली होती. पण शेवटची काय आणि शेवटून दुसरी काय पहिल्या दोन तुकड्यांच्या नंतर परिस्थिती सगळीकडे सारखीच होती. बारावीला तीन-चार मैत्रिणींशी चांगली ओळख झाली. सगळ्यांना चांगल्या tutions असल्याने त्या कॉलेजला फक्त practicals आणि परीक्षेपुरत्याच येत. एक मुलगी मात्र होती जिची घरची परिस्थिती श्वेताशी मिळतीजुळती होती. शर्वरी तिचं नाव. नेहा आणि कृपा यादेखील चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. स्वभाव बुजरा असल्याने श्वेता स्वत:हून कोणामध्ये मिसळायला जायची नाही. तर शर्वरीचा स्वभाव मात्र बोलका होता. कृपादेखील बेधडक स्वभावाची. कृपाशी तिची संस्कृतच्या वर्गात ओळख झाली, ते पण श्वेताला संस्कृतच्या वर्गात दोन-तीन वेळा पाहिल्याने कृपा स्वत:हूनच तिच्याशी बोलली म्हणून. नेहा कृपाची मैत्रीण म्हणून नेहाशीही ओळख झाली.
 
श्वेता आणि कृपा कॉलेजमध्ये थांबून अभ्यास करत बसत. श्वेताला घरच्या कटकटीपेक्षा कॉलेजची Library किंवा LR अभ्यास करायला जास्त बरी वाटे. कधी दोघी मिळून अभ्यास करत तर कधी दोघी आपापला. बारावीचं वर्ष भुरकन उडून गेलं. बोर्डाची परीक्षा जवळ आली. शर्वरी परीक्षेसाठी तिच्या आत्याच्या घरी रहायला आली. आत्याचं घर श्वेताच्या जवळच होतं. परीक्षेला दोघी एकत्रच येत-जात. पेपर संपल्यावर घरी जाताना आजच्या पेपरबद्दल थोडी चर्चा करून पास होण्याइतकी टोटल जुळते का ते बघत आणि उद्याच्या पेपरची कशी तयारी करायची याबद्दल रूपरेषा ठरवत. गणित पेपर - २ शेवटचा पेपर होता. तो झाला आणि शर्वरी भेटली आणि रडायलाच लागली. शर्वरीला ती या पेपरमध्ये नापासच होणार अशी खात्री झाली. श्वेताला तर पेपरमध्ये काय लिहिलंय ते आता मुळीच आठवत नव्हतं, पण अभ्यास एकसारखाच केल्याने तीदेखील धास्तावली.
 
पेपर जसे लिहिले त्यात पास होण्याचीच खात्री नाही तर engineering ला प्रवेश कुठून मिळणार! सगळेच निर्णय चुकत आहेत आणि असं व्हायला नको होतं असं श्वेताला फार वाटे पण आता मागचा विचार न करता सगळ्यातून फक्त पुढे मार्ग काढत जायचं होतं. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. पण त्याला कोणत्या रस्त्याने पुढे न्यायचं हे आपणच निवडायचं असतं. काहींना नशिबानेच काट्याकुट्याची वाट मिळते. पण पुढे तर जायचंच असतं. न जाणो काही दिवसांनी ऋतू बदलेल आणि काटेरी झाडांनाही फुले येतील!
 
क्रमश:

No comments:

Post a Comment